विरोध भाजपला, श्री रामाला न्हवे. विरोध द्वेषाला, आस्थेला न्हवे.

कोर्टाचा निकाल आला आहे. एक संविधानवादी म्हणून त्या निकालाचा आदर त्याहीवेळी केला आणि आजही करत आहे. आणि पुढेही करेलच.

वास्तूचा एक इतिहास होता त्यात बरेच मतभेद आहेत. कोणी म्हणते तिथे मशीद होती, कोणी म्हणते मंदिर, कोणी म्हणते बुद्ध विहार. जागा कोणा एकालाच मिळू शकते. आणि मिळाली त्याबद्दल श्री रामांवर आस्था ठेवणाऱ्या आणि त्याच राजकारण करून देशातील सर्वात मोठा पक्ष झालेल्यांनाही मनापासून शुभेच्छा. 

१९९२ चे प्रकरण सोडत (जे वाईटच होत), पुढील सगळी प्रोसेस कसही असो लोकशाही मार्गाने झाली हे महत्वाचे. लोकशाही आधी टोळी युद्ध, धार्मिक युद्धात अनेक लोक मारले गेले.  ही युद्ध सामान्य माणसापर्यंत देखील पोहोचायची आणि ज्याचा याशी संबंध न्हवता तेही मारले जायचे. आधुनिक जगात त्याला दंगली म्हणतात. पण ते कायदेशीर दृष्ट्या गुन्हा आहे हे अधिक महत्वाचे. त्यांच्यावर कारवाई होते हे महत्वाचे. आणि हे आता तरी निदान आपण थांबवले पाहिजे.

देशात एक मंदिर आणि एक मशीदही नसल्याने कोणाला काहीही फरक पडणार नाही. परंतु एका स्थळाचा मुद्दा हा राष्ट्रीय रूप धारण करतो किंवा केला जातो. तेंव्हा तिथे न्याय देणे कठीण जाते. 

मला वाटत आज जे भूमिपूजन झाले तसेच पाच एकर मशिदीसाठी मिळालेल्या जागेचे उदघाटन खुद्द प्रधानमंत्री महोदयांनी केले तर ते देशाचे प्रधानमंत्री शोभतील. कोर्टाने जर निकाल दिला आहे तर त्या निकालावर अंमलबजावणी देखील व्यवस्थित व्हायला हवी. जी झाली नाही. झाली असेल तर ती फक्त हिंदू समाजाच्या मतांचा विचार करून राम मंदिरा पुरती. अशीच अंमलबजावणी पाच एकर जागा मिळवून देणे आणि तिथे वाचनालय, हॉस्पिटल आणि मशीद बांधण्यासाठी प्रधानमंत्री महोदयांनी करायला हवी. त्यालाच न्याय म्हणू. जरी मुस्लिमांची मते भाजपला नको असली तरीही हे होणंही तेवढंच गरजेचे. 

मुस्लिमांवर पाच एकर जागे बाबत होणारा अन्याय हा जर हिंदुसोबत होणारा न्याय असेल तर अशा न्यायाचे एक भारतीय म्हणून निदान मी समर्थन करू शकत नाही.  आणि मंदिर ऊभारणे चालू झाले असल्याने हिंदू समाजाने देखील अशा न्यायाचे समर्थन करू नये. अशी निदान अपेक्षा राहील..

मी स्वतः रामायण वाचले आहे. त्यासाठी श्री राम मला कोणीही सांगू नये. निश्चितच श्री रामांबद्दल मनात आदर आहे. आणि पुढेही राहील. तो तुम्ही सांगता म्हणून नाही. माझा अभ्यास आहे म्हणून. भाजपला विरोध म्हणजे श्री रामांना विरोध नाही. विरोध श्री रामाच्या नावे उभ्या केलेल्या द्वेषाला आहे. तो पुढेही राहील. आम्ही श्री रामाचा देखील गैरवापर होऊ देणार नाही. जसा शिवरायांचा होऊ देत नाही अगदी तसाच..

राम मंदिराचा मुद्दा आता संपला आहे. पाच एकर जागेचा मुद्दा देखील मिटवून देशाने आता आपल्या प्रगतीकडे लक्ष द्यायला हवे. सोयी, सुविधा यावर बोलणारा समाज हा सर्वात सजग असतो. धार्मिक आणि अस्मितेच्या मुद्द्यावर बोलायला कोणीही सहज तैयार असतं. परंतु मूलभूत मुद्द्यांवर बोलणारी पिढी निदान इथून पुढे तरी निर्माण करावी लागेल. 

ती पिढी मूलभूत प्रश्न 'जय श्री राम' किंवा 'अल्लाहू अकबर' म्हणून मांडणार असेल तरीही चालेल की...

राम मंदिर उभारणीसाठी श्री रामांवर आस्था असणाऱ्या हिंदू बांधवांचे अभिनंदन. तसेच पाच एकर जागा सुन्नी बोर्डाला लवकर मिळो, आणि प्रधामंत्री महोदयांनी स्वतः येऊन त्याचे उद्घाटन करो यासाठी त्यांनाही शुभेच्छा..




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...