सणांचे समाज जीवनातील महत्व


सणांचे समाज जीवनातील महत्व

सण-उत्सव समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक जीवनाची जाणीव मानवामध्ये निर्माण झाली तेव्हापासून सणांचे अस्तित्व आहे. कधीच कोणताच सण साजरा न करणारा एकही समुदाय जगात झाला नाही आणि होणारही नाही. लोकांचे समान विचाराने, समान उद्देशाने, एका ठिकाणी एकत्र येणे, एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे, एकाच पद्धतीने कसलाही विरोध न करता काही नियमांचे पालन करणे; यातून समाजाचे संघटीकरण घडते. विविध कारणांमुळे दूर राहणारे एकमेकांच्या जवळ येतात. यामुळे परस्पर संबंध दृढ करण्याची संधी उपलब्ध होते. तसेच सणांद्वारे समाज मनावर काही विशिष्ठ उद्देश आणि भावना बिंबविता येतात. सणांना दरवर्षी एका निश्चित तारखेला साजरे करण्यामागे हेच उद्देश कार्यरत असतात.

समाजाला सण-उत्सवांची नितांत गरज आहे. त्याशिवाय समाज संघटीत राहू शकत नाही, विखुरला जातो. म्हणूनच आजच्या आधुनिकीकरणाच्या काळात सण-उत्सवांच्या प्रती सामाजिक ओढ आणखीन तीव्र झाली आहे. नवनवीन सण-उत्सव निर्माण केले जात आहेत, आयात केले जात आहेत आणि साजरे केले जात आहेत. विद्यार्थ्यांचे वार्षिक समारंभ असोत की एखाद्या व्यावसायिक फर्मचा वर्षपूर्ती सोहळा असो, एखाद्या Whatsapp ग्रुपचा वाढदिवस असो की आणखीन काही असो! हे सारेकाही त्याच मुलभूत मानवी स्वभावाचे प्रतिनिधित्व करीत आहेत, जो मागणी करतो की आम्हाला संघटीत राहण्यासाठी एका ‘सोहळ्याची’ गरज आहे. जेथे आम्ही आमच्या दैनंदिन जीवनातील ताण-तणाव विसरून समान भावनेने, समान उद्देशाने, समान पद्धतीने एकत्र येतो आणि एकमेकांशी जोडले जातो.

सण विविध प्रकारचे असतात. उदा. राष्ट्रीय, धार्मिक, प्रादेशिक आणि सांस्कृतिक. या सणांचा बारकाईने अभ्यास केल्यास असे दिसून येते की, यापैकी काही सणांमागे एखाद्या ऐतिहासिक घटनेची पार्श्वभूमी असते तर काहीं सणांमागे एखादी व्यक्ती उभी असते. जसे दिवाळीला रामाच्या विजयी मोहिमेच्या आगमनाची पार्श्वभूमी आहे. तर २५ डिसेंबरला साजरा केल्या जाणाऱ्या ख्रिसमसमागे येशुंच्या ख्रिस्तांच्या जन्मदिनाची पार्श्वभूमी आहे. सणांचे प्रकार असतात तसे त्यांना साजरे करण्याचेही प्रकार असतात. काही सण निव्वळ आनंदोत्सव असतात तर काही सण स्मरणोत्सव असतात, ज्याद्वारे इतिहासातील त्याग आणि बलिदानांचे स्मरण केले जाते. सण साजरा करण्याच्या पद्धतीवरून त्या सणांचा उद्देश आणि त्याद्वारे निर्माण केली जाणारी भावना यांचा अंदाज घेता येतो. पद्धती आणि भावना जितकी उच्च असेल तितकाच त्याचा उद्देशही उच्च असतो.

उदाहरणादाखल आपण राष्ट्रीय सणांबाबत बोलूयात. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस देशाच्या नागरिकांसाठी केवळ राष्ट्रीय सण नाहीत तर एक नवचेतना, नवप्रेरणा देणारे स्त्रोत आहेत. या सणांच्या आयोजनावर सरकार दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करते.  हे सण १२५ कोटी नागरिकांमध्ये स्फूर्ती निर्माण करतात, नवचेतना निर्माण करतात. या निमित्ताने विविध साधनांचा वापर करून देशाच्या इतिहासाला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविले जाते. देशासाठी त्याग आणि बलिदान केलेल्यांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. परिणामस्वरुप शेकडो नव्हे हजारो नागरिक, “आम्हाला देशासाठी काही करायचे आहे, आम्हाला समाजासाठी जगायचे आहे” असा संकल्प करतात. यामुळे अनेकांच्या आयुष्याला दिशा मिळते. आपल्या साऱ्या वेदना, दु:ख, हाल-अपेष्टा विसरून लोक एकत्र येतात. एकमेकांशी सहकार्याने वागायला हवे, प्रेमाने वागायला हवे; याची जाणीव त्यांच्या मनात निर्माण होते. चोहीकडे आनंदाचे वातावरण असते. लहानग्यांना देशप्रेमाचे बाळकडू पाजले जाते. १२५ कोटीं नागरिकांच्या मनात आपण ‘भारतीय’ असल्याची जाणीव बळकट होते.

दुसरे उदाहरण धार्मिक सणांचे. भारतात हिंदू बहुसंख्यांक आहेत. हिंदू बांधव वर्षभर विविध प्रकारचे सण साजरे करीत असतात. सर्वाधिक सण सर्वाधिक कालावधीपर्यंत साजरा करणारा हिंदू हा कदाचित जगातील एकमेव समाज असेल. हिंदू बांधवांचे बहुतेक सण प्रादेशिक असतात. दक्षिण आणि उत्तर भारतातील सण पूर्णतः भिन्न आहेत. पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील सण वेगवेगळे आहेत. तसेच एका प्रांतातील सण दुसऱ्या प्रांतात साजरे केले जात नाहीत. काही वर्षांपूर्वी बिहारी हिंदूंच्या छटपुजेला महाराष्ट्रात विरोध झाला होता. विरोध करणारे हिंदूच होते.  अशा विभिन्न सणांत दिवाळी मात्र देशभर साजरा केली जाते. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत बहुसंख्य हिंदू बांधव दिवाळी साजरी करतात. १४ वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येस परतल्याच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा केला जातो. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धनपूजा व भाऊबीज इ. दिवस आठवडाभर साजरे केले जातात. आठवडाभराच्या या सणाच्या वेळी घरांना रंगरंगोटी केली जाते, नवीन वस्तूंची खरेदी केली जाते. विविध प्रकारचे फराळ तयार केले जातात. आप्तजनांना, नातेवाईकांना आणि मित्रांना भेटून शुभेच्छा दिल्या जातात. एकमेकांना उपहार दिले जातात. दूर राहणारे नातेवाईक आणि कुटुंबातील सारे सदस्य एकत्र येतात. नोकरीनिमित्त किंवा व्यवसायासाठी गावाबाहेर किंवा देशाबाहेर असलेले घरी परतात. सारे मिळून हा आनंद साजरा करतात.

तिसरे उदाहरण प्रादेशिक किंवा सांस्कृतिक सणांचे आहे. विविध ठिकाणी विविध प्रदेशात जे प्रादेशिक किंवा सांस्कृतिक सण साजरे केले जातात ते त्या-त्या भूभागांपुरते मर्यादित असतात. ते त्या-त्या भागातील लोकांना एकत्रित करण्याचे, संघटीत करण्याचे काम करतात. त्या प्रदेशातील लोकांच्या संस्कृतीचे जतन-संवर्धन करणे आणि विकास घडविणे असे उद्देशदेखील या सणांच्या आयोजनामागे कार्यरत असतात. आपला देश बहुसांस्कृतिक देश असल्याने अनेक प्रकारचे सांस्कृतिक सण विविध राज्यांत साजरे केले जातात. या सणांच्या आयोजनामागे सारखेच उद्देश कार्यरत असतात. लोकांना एकत्र येण्याची संधी भेटावी, समाजाचे संघटीकरण घडावे इ. उद्देश या सणांच्या आयोजनाद्वारे साध्य केले जातात.

जगभरातील सण-उत्सव अशाच उद्देशाने साजरे केले जातात, त्यांच्यामागे असेच हेतू कार्यरत असतात. हे हेतू प्रादेशिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय, जाती-जमातीच्या किंवा वंशाच्या अस्मितेशी जुळलेले असतात. मर्यादित हेतू आणि उद्देश असणारे सण-उत्सव प्रादेशिक सण-उत्सव स्वरुपात मर्यादित राहतात. ते कधीच व्यापक रूप धारण करू शकत नाहीत. एका प्रदेशात साजरे केले जाणारे सण दुसऱ्या प्रदेशात साजरे केले जात नाहीत. धर्म एक असूनही प्रांत बदलले तर सण बदलतात. अखिल मानवजातीला संघटीत करण्यासाठी अखिल मानवजातीचा व्यापक सण-उत्सव असणे गरजेचे आहे, ज्याद्वारे मानवजातीला संघटीत करता यावे. अशा सण-उत्सावांच्या मागे प्रादेशिक, प्रांतीय, राष्ट्रीय, जातीय किंवा वंशीय अस्मिता नव्हे तर मानवजातीला एकत्र करू शकणारा वैश्विक प्रेरक असणे गरजेचे आहे. अशा उत्सवाची पार्श्वभूमी एखादी घटना किंवा व्यक्ती तर असावी परंतु ती प्रदेश-भूभाग, जात-वर्ण आणि वंशाच्या बंधनातून मुक्त असावी. त्या घटनेचा किंवा व्यक्तीचा स्वीकार करण्यासाठी कोणत्याही भूभागात कोणत्याही समूहाला कसल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये. जर अशी एखादी घटना किंवा व्यक्ती असेल तर तिच्याशी संबंधित सण-उत्सव सकल विश्वाचे सण-उत्सव बनू शकतात. ज्याच्या माध्यमातून जगभरातील लोकांना संघटीत केले जाऊ शकते. एकत्र केले जाऊ शकते. त्यांच्या मनावर काही उच्च भावना बिंबविल्या जाऊ शकतात.

वरील निकषांना ध्यानात ठेऊन जेव्हा आपण इस्लामी सणांकडे पाहतो, तेव्हा असे दिसते की, इस्लामने जगाला दिलेले सण याच प्रकारात मोडतात. ते अखिल मानवजातीचे वैश्विक सण सिद्ध होऊ शकतात. इस्लामी सणांमागे कोणतीही प्रादेशिक, प्रांतीय, जाती-वर्णीय किंवा वंशीय अस्मिता कार्यरत नसते. तर एक उदात्त विचारसरणी, एक उच्च हेतू कार्यरत असतो. म्हणूनच जगभरात जेथे कोठे इस्लामचे आगमन झाले तेथील जनतेने इस्लामी सणांना सहजतेने स्वीकारले. त्यांचा प्रदेश, त्यांचा वर्ण आणि त्यांचा वंश इस्लामी सणांसाठी कधीच अडथळा ठरला नाही. अरब असोत की युरोपीय, भारतीय असोत की मंगोल, तुर्क असोत की इजिप्ती, मलाई असोत की आफ्रिकी; सर्वांना या सणांनी एकाच धाग्याने बांधण्याचे काम केले. एकत्रित केले, संघटीत केले. एकच समान भावना, समान उद्देश सर्वांना देण्याचे काम केले.

*#कुर्बानी_आणि_मांसाहार
© Mujahid Shaikh
उस्मानाबाद महाराष्ट्र 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...