ज्यावेळी विनोद पिण्याच्या पाण्यासाठी मस्जिदीमध्ये गेला.....
दुपारची वेळ होती. दिवस उन्हाळ्याचे होते. अभ्यासिकेत सर्वजण जेवण करून दुपारची वामकुक्षी टेबलावर डोके ठेवून घेत होते. अभ्यासिकेशेजारी असणाऱ्या मशिदीमध्ये दुपारच्या आजानमुळे जे पेंगत होते त्या सर्वांची उठण्याची वेळ झाली होती. अभ्यासिकेच्या काही अतंरावर मशीद असल्याने होणाऱ्या आजाणच्या स्पीकरच्या आवाजावर कुणीही त्रागा केलेला कधी जाणवला नाही. उलट या आजाण च्या वेळेवर जेवण, चहा, आणि संध्याकाळी घरी जाण्याची वेळ ठरत असतं.
त्या दिवशी अभ्यासिकेत पाण्याचा तुटवडा होता. जेवणाच्या वेळेनंतर पाणी संपले होते.
पाण्याच्या विवंचनेत आपल्या मुस्लिम सहकारी मित्राचा पाण्याने धूतलेला प्रफुल्लित चेहरा पाहून विनोद म्हणाला 'अरे कुठून आला? '
'मशीदी मधून'
'पाण्याची सोय असते?'
'हो'
'मला जाऊन देतील? '
मित्र गावाकडील असल्याने मस्जिदमध्ये एकदा तिरकट म्हतारा असेल जो पाणी भरून देणार नाही. या विवंचनेत होता.
'ठीक आहे आपण जाऊ'
विनोद आणि तो सोबत गेले.
दरवाज्यातून आत शिरताना नमाज पडून शेवटी बाहेर येणारे मौलवी आणि मस्जिदीचे काही जबाबदार नमाजी बाहेर पडत होते.
मौलवी विनोदला अभ्यासिका जवळ असल्यामुळे तोंडओळखीने ओळखत होते.विनोद जरा हबकला. मौलानाने मला विचारले, "क्या भाई नमाज के लिए देरी? "
"नही हाफिजसाहब नमाज जमात के साथ हो गयी.दोस्त को पाणी पिना था. वह जरा हिचकीचा रहा था इसलिए साथ आ गया. "
विनोदकडे पाहत मौलवींनी शुद्ध मराठीत, "अरे त्यात काय यायचं आणि बिन्दास्त पिऊन जायचं"
त्या दिवशी विनोद मस्जिदीमध्ये आयुष्यात पहिल्यादा आला होता. त्याने कुतूहलाने सगळी माहिती जाणून घेतली. अजाण म्हणजे नमाज? यांसारखे गैरसमज दूर झाले.
सोबत इतर मित्रांच्या आणलेल्या चार बाटल्या भरून नेल्या. बाहेर असणाऱ्या सर्वांनी पाण्याचा आस्वाद घेतला.
नंतर मित्रांच्या चर्चेत त्याने आपण मशिदीत गेल्याचा अनुभव आणि मिळालेली वागणूक बोलून दाखवली. त्यानंतर विनोद सुलतानशिवाय कितीतरी वेळा मस्जिदमध्ये पाण्यासाठी गेला. तेही कोणतीही शंका मनात न बाळगता.
आज किस्सा आठवला कारण उत्तरप्रदेशात एका मुस्लिम मुलाला मंदिरात पाणी पिण्यास गेल्याने मारहाण करण्यात आली. कदाचित वाटायला लागले गावाकडील मारुतीच्या मंदिरात डोक्यात टोपी, अंगावर मुस्लिम पेहराव असताना लक्ष्या, सागऱ्या, राहुल्या यांच्याबरोबर खेळलेली लपाछपी महादेवाच्या मंदिराजवळ वडाच्या झाडावर खेळलेल्या पारंब्या, लक्ष्मीच्या जवळ चिंचेच्या झाडाच्या खाल्लेल्या चिंचा माझा मुलगा करू शकेल कि नाही?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा