मुस्लिम आरक्षण पुर्ण समाजाची गांभीर्याची आणि नियोजनबद्ध लढाई आहे -इरफान शेख

मराठी मुसलमान वॉट्सअप क्रमांक 7249124871

मुस्लिम आरक्षण हा अतिशय गंभीर विषय आहे.
ही गोष्ट विशेष करून आम्ही मुस्लिम तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे.
कारण मुस्लिम आरक्षण हा विषय जितका गंभीर आहे त्याच्याविषयी तितकं गांभीर्य आमच्यात निर्माण झालं पाहिजे.
एखाद्या गोष्टीला तेंव्हाच पूर्ण न्याय आपल्याकडून मिळतो जेंव्हा त्या गोष्टीविषयीच पूर्ण गांभीर्य आपल्यात असत.

मी अतिशय जबाबदारीने हे सांगतो की अजूनही मोठ्या प्रमाणात मुस्लिम आरक्षणाच्या गांभीर्याची उणीव आहे.ती उणीव आम्हा तरुणांना भरून काढावी लागेल.
कारण पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्यावर संघर्षात खऱ्या अर्थाने ताकद निर्माण होते.आणि तीच ताकद असते जी बदल घडवण्याची धमक ठेवते!

ही पूर्ण समाजाची सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध लढाई आहे.ही लढाई समाजाची आहे याला राजकीय म्हणून त्या लढाईला दिशाहीन आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या हाताच खेळणं किंवा इव्हेंटच साधन ठरवलं जाऊ शकत नाही.आणि ही लढाई राजकीय आहे तर आजपर्यंत मुस्लिम समाजाने कुठल्या पक्षाला लढण्यास अडवलं?
का नाही एखाद्या पक्षाने खऱ्या अर्थाने आणि पूर्ण पक्षीय बळ लावून मुस्लिम आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले?
मुस्लिम समाज हा दूधखुळा समजण्याची घोडचूक कोणी करू नये.
मुस्लिम समाजाच्या स्वतःच्या बऱ्याच अडचणी आहेत आणि बाहेरून निर्माण केल्या जाणाऱ्या अडचणी देखील ढिगाने आहे.अश्यात देखील त्याने कधी संयम ढळू दिला नाही.याचा अर्थ असा नाही की तो त्याचे हक्क विसरला किंवा न्यायाची लढाई विसरला.

जेंव्हा मराठा आरक्षणाचा विषय पेटतो तेंव्हा आपण जागे होतो आणि आपल्यालाही आरक्षण पाहिजे असं आपल्याला वाटूं लागत.पून्हा आपण हे सगळं विसरतो.ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
खरं तर सर्वात जास्त मुस्लिमांना आरक्षणाची गरज आहे.मात्र नेमकी किती गरज आहे,समाजाची वाईट अवस्था दर्शवणारी अधिकृत आकडेवारी आपण पाहत नाहीत,केंद्र आणि राज्य सरकारने नेमलेल्या समित्या आणि अभ्यास गटांची आपल्याला साधी नावे देखील माहिती नसतात.आपण कधी ते अभ्यासत नाहीत.माफ करा,वाईट वाटू देऊ नका मात्र हे सत्य आहे.आणि पुढे जाताना काही सत्य आपल्याला स्वीकारावे लागतात.भलेही ते आपल्या विरोधात असतील किंवा आपल्याला आपली चूक दाखवणारे असतील.कारण वारंवार त्याच चुका करत पुढे जाणे म्हणजे अपयशाचा मार्ग वाढवत चालणे आहे.

आणि अश्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता आपल्याला मुस्लिम आरक्षणाची लढाई ही राजकीय आहे म्हणून जर पेटवू पहात असेल, तर त्याला अतिशय स्पष्टपणे विचारा की आजपर्यंत तुझ्या पक्षाने आमच्यासाठी किती आंदोलने केली?आजपर्यंत तुझ्या पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न घेऊन किती वेळा रस्त्यावर उतरला?आणि तुझा पक्ष स्वतःच्या पातळीवर किती वेळा मुस्लिम आरक्षणावर लढला?
हे सगळे प्रश्न रास्त आहेत.पक्ष कुठलाही असुद्या..मुस्लिम म्हणजे त्यांना फक्त राजकीय वापराच मटेरियल वाटत.त्यांना मुस्लिमांच्या फक्त एकगठ्ठा मतांची चिंता असते.मुस्लिमांच्या प्रश्नांची चिंता कधी त्यांना वाटत नाही.आपण ज्यांना निवडणुकीत रसद पुरवतो त्यांना देखील कधी आपल्या प्रश्नांत रस नसतो हे आपलं दुर्दैव!

ते म्हणतात ना त्याच दुखणं त्याला माहिती..तसंच काहीसं आपलं आहे...मात्र आता आपल्याला या सर्व गोष्टी लक्षात घेत बदल घडवण्याची धमक ठेवणारा संघर्ष करावा लागणार आहे.आणि त्या संघर्षात अधिक ताकद निर्माण करण्यासाठी संपूर्ण समाजातील घराघरात आपल्याला मुस्लिम आरक्षणाच गांभीर्य निर्माण करावं लागेल...जी आपली प्राथमिक जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपलं कर्तव्य आहे विशेष करून मुस्लिम युवकांच!

~इरफान शेख
(9518586155)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...