भारत इतिहास संशोधक मंडळाचे विस्मृतीत गेलेले इतिहास संशोधक : मिया शिकंदर लाल अत्तार

विसाव्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात इतिहास संशोधकांची मांदियाळी निर्माण झाली. यामध्ये सांगली जिह्यातील भिलवडीच्या मिया शिकंदरलाल अत्तार यांचे कार्य मोलाचे आहे. त्यांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात इतिहास विषयक अनेक शोधनिबंध वाचले. दक्षिण महाराष्ट्राच्या अज्ञात इतिहासावर प्रकाश टाकण्याचे कार्य त्यांनी केले. मात्र, त्यांचे हे कार्य आजवर दुर्लक्षितच राहिले आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने त्यांचे समग्र वाङमय संकलीत करण्यात येत असून, लवकरच ते प्रसिध्द होणार आहे. आज 12 ऑगस्ट रोजी त्यांच्या जयंतीनिमित्त मिरजेत त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. 
गेल्या दीडशे वर्षात इतिहास संशोधकांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पायपीट करुन, महत्त्प्रयासाने लक्षावधी कागद जमा केले. मराठेशाहीतील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाची अस्सल साधने या संशोधकांनी पदरमोड करुन प्रसिध्द केली. वि. का. राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे, द. ब. पारनीस, चिमणाजी वाड, गो. स. सरदेसाई यांच्याबरोबरच ग. ह. खरे, दत्तो वामन पोतदार, आबा चांदोरकर, शं. ना. जोशी, वा. सी. बेंद्रे, आप्पासाहेब पवार अशा अनेक संशोधकांनी खेड्यापाड्यात, जहागीरदार, इनामदार यांच्या वाड्या-हुड्यात धुळखात पडलेल्या आणि कसरींचे लक्ष्य बनलेल्या लक्षावधी कागदपत्रांचे मंथन करुन मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास समाजासमोर आणला.
 याच संशोधकांच्या मांदीयाळीत सांगली जिल्ह्यातील मिया शिकंदरलाल अत्तार यांचे नांव घ्यावे लागले. मात्र, आजवर हा इतिहास संशोधक अज्ञातच राहिला आहे.मुस्लिम समाजातला एक प्राथमिक शिक्षक स्वातंत्र्यपूर्व काळात विद्यादानाचे पवित्र कर्तव्य पार पाडीत असताना मौलिक इतिहास संशोधन करतो, पुण्यासारख्या ठिकाणी त्याच्या संशोधनाला मान्यता मिळते, मात्र, आजवर त्याच्या या कार्याची कुणीच दखल न घ्यावी, ही खेदाची बाब आहे.

हे पण वाचा :-


 मिया शिकंदरलाल अत्तार हे सांगली जिह्यातील सरकारी शाळेवर असणारे प्राथमिक शिक्षक. सरकारी शाळेवर असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. या बदल्यांच्या काळात त्यांना त्या-त्या गावांच्या इतिहासाविषयी गोडी निर्माण झाली. ज्या गावात ते जात, त्या ठिकाणच्या ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, मशिदी, मठ, दर्गे, वाडे यांची माहिती घेत. त्यासंबंधीची कागदपत्रे ते जमा करीत. गावात एखादा जहागीरदार, इनामदार असेल तर त्यांच्याकडे जावून त्यांना विनंती, आर्जवे करुन त्यांची कागदपत्रे जमा करीत, त्यांचे वाचन करीत.
याच काळात पुणे येथे प्रसिध्द इतिहास संशोधक वि. का. राजवाडे यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली होती. मंडळामार्फत पाक्षिक सभा होत. त्यामध्ये इतिहास संशोधनपर निबंध वाचले जात. ते मंडळाच्या त्रैमासिक आणि इतर ऐतिहासिक पुस्तकांमध्ये प्रसिध्द होत. शिकंदरलाल अत्तार यांना मंडळाच्या कार्याची माहिती मिळताच, ते या मंडळाचे सभासद झाले आणि आपले संशोधन कार्य मंडळातील संशोधकांसमोर मांडू लागले.सांगली जिह्यातील (तत्कालीन सातारा जिल्हा) वाळवा, पलूस, देवराष्ट्रे, भिलवडी या भागात त्यांच्या बदल्या होत. 
या भागात शिक्षक म्हणून कार्यरत असताना त्यांनी आसपासच्या गावातील ऐतिहासिक घराण्यांची आणि देवस्थानांची कागदपत्रे जमा केली आणि त्यावर आधारीत अभ्यासपूर्ण निबंध पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पाक्षिक सभेत, संमेलनात वाचले. या परिसराच्या इतिहासातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतीक घडामोडींवर मौलिक संशोधन केले.
त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये आष्टे येथील भावई उत्सव, भिलवडी येथील मदनशहा दर्गा, संभुराज कवीचे साहित्य, रहिमतपूर येथील रणदुल्लाखानाची कबर, जुनी मराठी गीते अर्थात गुराख्याची गाणी, दास कवीकृत सखु चरित्र, बसवलिंगकृत संतमालिका, मराठी जंगनामा इत्यादींचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागले. या व्यतिरीक्त त्यांनी अनेक निबंध सादर केले.
आष्टे येथील भावई उत्सव अथवा शाक्तसंप्रदायी खेळ हा विस्तृत निबंध म्हणजे त्यांच्या अभ्यासपूर्ण इतिहास संशोधनाचा उत्तम नमुना आहे. भावई खेळाचा प्रारंभ त्यातील प्रथा आणि परंपरा यांचे अभ्यासपूर्ण विवेचन या निबंधात त्यांनी केले अरहे. इतिहासप्रसिध्द घराण्यातील कागदपत्रे तर त्यांनी शेकडोंच्या संख्येने जमा केली. त्याचबरोबर त्यांनी ग्रामीण भागात विविध जातीजमातींच्या लोकसाहित्याचेही संकलन केले. काही कवींचे अप्रकाशित वाङमय उजेडात आणले. ‘गोरखगोधडी’ हा मंत्रतंत्र विद्योवर आधारीत काव्यात्मक ग्रंथ, दासकविकृत सखुचरित्र आणि बसवलिंगकृत संतमालिका यांचा यात समावेश होता.
मुसलमानी कवींनी मोहरम सणावेळी होणाऱ्या करबलामध्ये म्हणणण्यासाठी काही पदे मराठीत रचली आहेत. त्यांना ‘रिवायती’ म्हणतात. तसेच हसन आणि हुसेन यांच्या रणसंग्रमाचे वर्णन करणारा ‘जंगनामा’ हा काव्यप्रकार असतो. हे साहित्य त्यांनी जमा करुन त्यावर निबंध सादर केला. दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नसताना शिकंदरलाल अत्तार यांनी गावोगावी उन्हा-पावसाचा विचार न करता भटकंती केली. या भटकंतीत त्यांनी केवळ कागदपत्रेच गोळा केली असे नव्हे तर वाघनखे, तोफा, तोफांचे गोळे, हस्तलिखिते, नाणी, हत्यारे अशा अनेक ऐतिहासिक वस्तूही गोळा केल्या. त्यापैकी काही वस्तू मंडळात दिल्या. आजही त्यांच्या नावचे एक दफ्तर मंडळात आहे. त्यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे आहेत.
सन 1917 मध्ये ते भारत इतिहास संशोधक मंडळाचे सभासद झाले आणि त्यांनी सलग 25 वर्षे तत्कालीन सातारा जिह्यातील विविध गावात पायपीट करुन इतिहास संशोधनाचे काम केले. बंगाली भाषेवरही त्यांचे प्रभुत्त्व होते. या भाषेतील काही पुस्तकांचे मराठी भाषांतर त्यांनी केले.सन 1943 च्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर भारत इतिहास संशोधन मंडळाचे चिटणीस चिंतामणी कर्वे यांनी म्हटले आहे, “पै. मिया शिकंदरलाल अत्तार या मुसलमान व्यासंगी गृहस्थांनी मराठीची मोठी सेवा केली आहे. ते इतिहास संशोधकही होते. त्यांच्या अकाली मृत्यूने मुसलमान समाज आणि हिंदू समाज यांच्यातील दुवा नाहीसा झाला आहे.”
स्वातंत्र्यपूर्व काळात एका सामान्य प्राथमिक शिक्षकाने इतिहासाचे महत्त्व ओळखून इतिहास संशोधनाचे व्रत हाती घेतले आणि सलग 25 वर्षे निष्ठेने हे व्रत जोपासले. मात्र, आजवर त्यांच्या कार्याची दखल कोणीच घेतली नाही. पुण्यासारख्या ठिकाणी जावून तत्कालीन इतिहास संशोधकांची मान्यता मिळविणाऱ्या सांगली जिह्यातील मिया शिकंदरलाल अत्तार यांचे कार्य आजवर अज्ञातच राहिले आहे.

लेखक 
मानसिंगराव कुमठेकर
मिरज 
हे पण वाचा :-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...