मराठवाड्यातील ऊसतोड मजुराचा मुलगा कसा बनला नेत्यांचा पुढारी
ऊसतोड कामगाराचा मुलगा बनला ‘पुढारी’
मराठवाड्यातील दुष्काळी भागातल्या बीड जिल्ह्यामधील ऊसतोड कामगाराचा तो विशीतला पोरगा. गरीबीला कंटाळून आजीच्या बटव्यातले ५०० रुपये घेतो आणि थेट मुंबई गाठतो. ओळखीचं कोणीच नसल्याने फूटपाथवर झोपतो. खिशातले पैसे संपल्यावर ना पोटाला अन्न ना अंघोळीला पाणी अशी अवस्था होते. मात्र आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडतो. समयसूचकता आणि निरीक्षण शक्ती यामुळे दैवाला सुद्धा त्याच्याबाजूनं यावं लागतं. आणि मरीन ड्राईव्हच्या फूटपाथवर झोपणारा हा मुलगा कापड दुकानाचा मालक होतो. निव्वळ पुढाऱ्यांना पांढरी खादीची कपडे विकणारा म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होतो. ही फिल्मी स्टाईलची कथा आहे बीडच्या आलम शेखची. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात ‘पुढारी’ नावाचा कपड्यांचा ब्रॅण्ड प्रस्थापित करणाऱ्या आणि आलम पुढारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या तरुणाची.
मराठवाड्यातलं बीडच्या पाटोदा तालुक्यातलं चिखली (नाथ) हे एक छोटंसं खेडं. याच खेड्यात बशीर भिक्कन शेख, आपली आई, पत्नी शहाजानबी, मुलगा आलम आणि ४ मुलींसह राहत होता. बशीर आणि शहाजानबी ऊसतोडकामगार होते. हे शेख दाम्पत्य प्रचंड मेहनती. ऊस तोडून जो रोजगार मिळायचा त्यातून आपल्या कुटुंबाचं कसंबसं पोट भरत होते. आलमचं प्राथमिक शिक्षण चिखली(नाथ) मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. ८वी ते १० वी चिखली(नाथ) मध्ये गहिणीनाथ विद्यालयात तो शिकला. पाटोद्याच्या मूगगावातल्या आर ऍण्ड डी कनिष्ठ महाविद्यालयातून १२ वी झाली. सध्या तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, कुसळंब येथे विज्ञान शाखेतून पदवीच्या तिसऱ्या वर्गात शिकत आहे.
लहानपणापासून आलम हुशार. स्ट्रीटस्मार्टनेस असलेला. आपल्या अम्मी-अब्बाला ऊस तोडताना पाहून कळवळणारा. आपण पण घरासाठी काहीतरी केलं पाहिजे ही तळमळ उराशी होती. त्यात मित्रमंडळींमध्ये मुंबईची, इथल्या नोकरीची, छानछोकी आयुष्याची चर्चा असायची. आपण मुंबईलाच गेलो तर... खूप पैसे कमावू. अम्मी-अब्बाला दुसऱ्याच्या शेतात राबायची गरज भासणार नाही. पण मुंबईला जाणार कसं? हा यक्षप्रश्न होताच. अम्मी-अब्बाकडे तर पैसे नसणार आणि असलेच तरी मुंबईला जाण्यासाठी त्यांनी कधीच दिले नसते. मित्रांपैकी कोणी आपल्याला देईल असं पण कोणी नाही. करायचं काय... या विवंचनेत असताना आजीचा बटवा त्याला दिसला. आजीने जपून ठेवलेले पाचशे रुपये त्याने घेतले. सरळ मुंबईची ट्रेन पकडली ती सुद्धा तिकीटाविना आणि २६ डिसेंबर २०१६ ला सीएसटीला उतरला. दोन दिवसांच्या खाण्यापिण्यातच खिशातले पैसे संपले.
आलमला पुढाऱ्यांचं लहानपणापासून आकर्षण. मंत्रालय परिसरांत त्यांना पहायचा आणि नंतर मरीन ड्राईव्ह समुद्र किनारच्या परिसरांत हिंडायचा. मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर दरदिवशी एक तरी केक कापला जायचा. मात्र एकेदिवशी खूप केक कापले गेले. एवढे केक आज का कापले याचं कारण त्याने एकाला विचारलं. “आज थर्टीफर्स्ट है ना”. मतलब? खेड्यातल्या आलमला ते कळलं नाही. “अरे कल से नया साल चालू होगा. इसलिये ये सेलेब्रेशन हो रहा है.” समोरच्याने सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर तो सुलभ शौचालयात अंघोळीला गेला. मात्र खिशातले पैसे संपले होते. अंघोळीसाठी पाच रुपये पण नव्हते. काय करायचं असा गळ्याशी हात लावून विचार करत असताना हाताला गळ्यातलं सोन्याचं लॉकेट लागलं. त्याच्या अम्मी-अब्बूने बनवलेलं.
त्याने ते लॉकेट विकलं. ३४०० रुपये त्यातून मिळाले. मस्त अंघोळ केली. पोटभर खाऊन घेतलं. नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून मस्त खादीचा पॅंट शर्ट घालून चकाचक पुढाऱ्यासारखा बनून मंत्रालय परिसरांत फिरु लागला. तेवढ्यात एकजण तिथे आले. त्यांनी आलमला हे कपडे कुठून आणले विचारलं. त्या व्यक्तीला मित्रासाठी हवे होते. ते पण तातडीने. काही सेकंदातच आलम बोलला कि हे कपडे आम्ही आणून विकतो. दुकान कुठे आहे विचारल्यानंतर म्हणाला आमचा कारभार मोबाईलवरुन चालतो. त्या व्यक्तीने एका ड्रेसची ऑर्डर दिली. “पैसे आगाऊ द्यावे लागतील”. त्या व्यक्तीने थोडा विचार केला. ओठावरचं मिसरुड न फुटलेल्या त्या मुलाचा आत्मविश्वास पाहून त्याने आलमला पैसे दिले. काही वेळात कपडे घेऊन आलम आला. ती व्यक्ती खूश झाली. तो व्यक्ती एका राष्ट्रीय पक्षाचा आमदार होता. आलमचा प्रामाणिकपणा त्यांना भावला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून आलमने त्यांना त्यांच्या वर्तुळातील अन्य मित्रांना आलमकडून कपडे घेण्याविषयीची शिफारस करण्याची विनंती केली. मोठ्या दिलाने त्या आमदाराने काही मित्रांचे संदर्भ आलमला दिले. १ जानेवारी २०१७ रोजी आलमने एका दिवसांत ९ ते १० हजार रुपये निव्वळ खादीचे पांढरे कपडे विकून मिळवले.
या पैशातून त्याने मंत्रालयाबाहेर कपडे विकण्यास सुरुवात केली. अनेक आमदार त्याच्याकडूनच खादीचे कपडे खरेदी करु लागले. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार बाबाजानी दुर्राणी, तत्कालीन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, सुरेश धस अशा सर्वपक्षीय आमदारांनी आलमला खूप मदत केली. ७० ते ८० सर्वपक्षीय आमदारांच्या पाठिंब्यामुळेच आलमचा ‘आलम पुढारी’ झाला. ‘पुढारी’ नावाने त्याने स्वत:चा ब्रॅण्ड प्रस्थापित केला. एका वर्षाच्या आत आमदार निवास येथील पुढारी वस्त्रभांडाराचा तो मालक झाला. विधानसभा आणि विधानपरिषदेचे असे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यातील अंदाजे ६६ महिला आमदार आणि ५० इतर आमदार सोडून उरलेले आमदार आलमच्या पुढारी ब्रॅण्डचे खादीचे कपडे परिधान करतात.
भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात पुढारी वस्त्रभांडार सुरु करुन तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा आलमचा मानस आहे.
एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ते एका वस्त्रभांडार साखळीचा मालक हा आलमचा प्रवास कोणत्याही भारतीय ग्रामीण तरुणास प्रेरणादायी आहे.
प्रमोद सावंत
८१०८१०५२३२
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा